नाशिक : बोलो जय हनुमान की..., महाबली हनुमान की जय... पवनसुत हनुमान की जय.., असा जयजयकार करत जुन्या नाशकातून संध्याकाळी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. अंजनीपुत्र हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीराम शक्तिपीठाच्या वतीने वाकडी बारव परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. महामंडलेशवर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रा काढण्यात आली होती. दूधबाजारातील श्रीगणेश मंदिरात आरती करून प्रभू रामचंद्र व महाबली हनुमान यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खेरे, लक्ष्मण सावजी, रामसिंग बाबरी, रोशन जाधव, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीशक सोमनाथ तांबे यांच्यासह सरस्वती महाराज यांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मिरवणुकीत सहभागी कलशधारी महिलांनी लक्ष वेधून घेतले. हतरुंडी येथील रामलीला कला पथकाच्या वतीने आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी हनुमानाच्या वेशभूषेतील कलावंतासोबत अनेकांनी ‘सेल्फी’ घेतले. अग्रभागी सरस्वती महाराज यांची बग्गी होती. मिरवणुकीत सहभागी सर्व भक्तांच्या हातात भगवे ध्वज होते. सहभागी ढोल पथकाच्या तालावर थिरकत हनुमानाचा जयघोष करत मिरवणूक दूधबाजार, भद्रकाली, मेंनरोड, रविवार कारंजा, मालेगाव सॅण्डवरून रामकुंड येथील दुतोड्या मारु तीजवळ रात्री उशिरा पोहचली. दरम्यान, शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा
By admin | Published: April 12, 2017 1:04 AM