दरवर्षी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती, लंबा हनुमान, तपोवनातील बटुक हनुमान मंदिर, गजानन चौक मारुती मंदिर, झुंड हनुमान मंदिर, गंगाघाट दुतोंड्या मारुती मंदिर, सेवाकुंज येथील संकट मोचन हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून हनुमान जयंती उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी प्रमाणे यंदा पुन्हा कोरोना सावट असल्याने मंगळवारी सकाळी मोजक्या भविकांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीपूजन, अभिषेक, आरती करून देवाला नैवेद्य दाखवून साध्य पध्दतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
पंचवटी परिसरात दरवर्षी हनुमान जयंतीला प्रसाद वाटप केला जातो. मात्र, यावर्षी देशात कोरोनोने धुमाकूळ घातल्याने तसेच शहरात संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये व संसर्ग वाढू नये यासाठी धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. पंचवटीत हनुमान मंदिरात पहाटे हनुमान जन्म साजरा करण्यात येऊन दैनंदिन पूजन, आरती, जन्मोत्सव तितक्याच धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे यंदा कोणत्याही मंडळाने पालखी सोहळ्याचे व महाप्रसादाचे वाटप केले नसल्याचे दिसून चित्र आले. हनुमान जयंतीनिमित्त परिसरातील हनुमान मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात येऊन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरासमोर रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या होत्या.