नाशिक : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली असल्यास कुठल्याही प्रसंगाने ओढावलेल्या नैराश्यावर तसेच दुर्धर आजारावर मात करून आनंदी जीवन जगता येऊ शकते. सर्वसामान्यांप्रमाणे संसार फुलवून जीवनाचा आनंद लुटता येणे शक्य होते, असा संदेश मंगल मैत्री मेळाव्यातून समाजापर्यंत गेला. या मेळाव्यात एचआयव्ही सहजीवन जगणारे विवाहेच्छुक युवक-युवती एकत्र आले. यावेळी दहा मुला-मुलींच्या रेशीमगाठी जुळल्या. यश फाउंडेशन, नेटवर्क आॅफ पॉझिटीव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध-नियंत्रण पथकाच्या संयुक्त विद्यमाने दहावा मंगल मैत्री मेळावा रविवारी (दि.२१) घेण्यात आला. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्राचे व्यवस्थापक कमलाकर घोंगडे, नामदेव येलमामे, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाचे प्रमुख योगेश परदेशी, फाउंडेशनचे रवींद्र पाटील, संगीता पवार आदी उपस्थित होते.सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या विवाहेच्छुक एचआयव्ही सहजीवन जगणाºयांचा वधू-वर परिचय मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांसह इंदूर तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधूनही पालकांसह युवक-युवतींनी हजेरी लावली होती. यावेळी सुमारे तीनशेपेक्षा अधिक विवाहेच्छुकांनी मेळाव्यात सहभागी होऊन एकमेकांचा परिचय करून दिला. दिवसभरात एकूण २४ बैठका पार पडल्या. यामध्ये दहा विवाहेच्छुकांना पुढील आयुष्य एकमेकांच्या साथीने जगण्यासाठी जोडीदार मिळाला. साधकबाधक चर्चा, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून दहा तरुण-तरुणींनी एक मेकांची जीवनसाथी म्हणून निवड केल्याची माहिती रवि पाटील यांनी दिली. संसाराचा गाडा ओढण्यापूर्वी आर्थिक स्थिती सुधारावी आणि स्वावलंबी आनंदी जीवन जगता यावे, या उद्देशाने विवाहेच्छुकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांसह आरोग्य उपचाराबाबतही माहिती देण्यात आली.
मंगल मैत्री मेळाव्यास राज्यासह परराज्यातूनही विवाहेच्छुकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:03 AM