नाशिक : डेंग्यू, मलेरियाची लागण रोखण्यासाठी काय योजना? गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना राबवाल? प्रदूषण नियंत्रणासाठी मनपा काय उपाययोजना करणार? दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय कराल? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्राच्या भावी महापत्रकारांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांना धारेवर धरले. निमित्त होते, बालदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिलेली पत्रकारिता करण्याची, अनुभवण्याची संधी ! या उपक्रमांतर्गत नाशकातील विविध मराठी, इंग्रजी माध्यमाच्या खासगी व महापालिका शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांनी पत्रकारितेचा अनुभव लोकमतच्या नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य कार्यालयात घेतला. दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी भावी महापत्रकारांची भूमिका बजावली.
यावेळी त्यांनी महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील यांची मुलाखत घेत विविध सामाजिक समस्यांशी निगडित प्रश्नांचा वर्षाव केला. भावी पिढीच्या मनात गोंधळ घालणा-या शहराच्या आत्मियतेविषयीचे प्रश्न ऐकून भानसी व पाटील अवाक् झाले. एकापेक्षा एक सरस अशा भन्नाट कल्पनेची जाणी करून देणारे प्रश्न यावेळी भावी महापत्रकारांनी विचारून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी घंटागाडीवर सकाळी वाजविल्या जाणा-या ध्वनिफितीचा मर्यादेपेक्षा अधिक आवाज प्रबोधनाऐवजी प्रदूषणाला निमंत्रण देणारा ठरत असल्याचेही त्यांनी भानसी यांच्या लक्षात आणून दिले. गोदावरी प्रदूषणमुक्तीच्या आणि गोदा विकासाच्या मारल्या जाणा-या गप्पा प्रत्यक्षात का अंमलात आणल्या जात नाही, असा रोख-ठोक सवालही ‘लोकमत’च्या व्यासपिठावरून या भावी महापत्रकारांनी उपस्थित केला. शहरातील महापालिकेची सुस्तावलेली आरोग्यसेवा आणि मृतशय्येवर पोहचलेले मनपाचे दवाखाने कधी सुधारणार असा थेट प्रश्नही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे, महापौर रंजना भानसी यांनीही या बाल सुलभ शंकांचे निरसन करीत अतिशय खेळकरपणे त्यांची उत्तरे दिली.भावी पिढीपुढे विकासाच्या गप्पा मारून आता यापुढे चालणार नाही , तर प्रत्यक्षात त्यांना ‘विकास’ हवा आहे, व त्याची त्यांना जाणही आली आहे, याची खात्री यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींना पटली.
नाशिकच्या भावी महापत्रकारांचा ‘लोकमत’मध्ये एक दिवस दप्तराचं वाढतं ओझं या समस्येवर व्यक्त केली चिंता. शेतकरी व शेतीमालाला मिळणा-या हमीभावाविषयी व्यक्त केली नाराजी. सरकारने आश्वासने न देता प्रत्यक्षात योजना प्रभावीपणे राबविण्याची केली मागणी. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे झालेले हाल यावरही टाकला बाल पत्रकारांनी लेखणीतून प्रकाश. गोदा प्रदूषणाविषयीचा मुद्दाही पोटतिडकीने मांडत महापौरांना बोलते केले. या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग नेहा कोठावदे (सारडा कन्या विद्यालय)श्वेता मोघे (आदर्श माध्यमिक विद्यालय)निशा भदाणे, अमिषा डावरे ( रचना विद्यालय)पुर्वा चौधरी (सरस्वती विद्यालय)गायत्री वाणी (डे केअर सेंटर)श्रुती पाटील (न्यू इरा स्कूल)आयुष कटारिया, अर्जित कोरडे (अशोका ग्लोबल अॅकडमी)प्रतीक्षा काकड (छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद)मुग्धा थोरात (न्यू मराठा हायस्कूल )मंजिरी पाटील, मृणालिनी देशमुख (मराठा हायस्कूल)हेतवी रुपरेल (इस्पॅलियर एक्सपिरिमेंटल स्कूल)वैदेही शिरास, (सीडीओ मेरी हायस्कूल)सानिया अन्सारी (गुरूगोविंद पब्लिक स्कूल)