नाशिक : आल्हाददायक सायंकाळ, पाऊस गीतांचे सुमधुर गायन, त्याला तितक्याच लयबद्धतेने मिळत असलेली संगीतसाथ, टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा प्रतिसाद या साऱ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते ‘पाऊस गीत’ कार्यक्रमाचे. कापडबाजारातील व्यंकटेश बालाजी मंदिरात वेणूनादच्या वतीने ही मैफल पार पडली. मिलिंद गांधी यांच्या पाऊस गीतांना बासरीवादक मोहन उपासनी यांनी स्वरबद्ध करून रसिकांना एक वेगळीच अनुभूती दिली. ‘विठ्ठलारे पांडुरंगा ऐक माझे सांगणे’ या अभंगातून गायक ज्ञानेश्वर कासार याने सद्यपरिस्थितीत ओढ घेतलेल्या पावसाला पुन्हा बरसायला लाव ही आर्त हाक घातली. ‘अंग माझे चांदण्याने भिजवले तू’ या गीतातून गायिका स्वागता पोतनीस यांनी रसिकांना डोलायला लावले. तबला साथ सतीश पेंडसे, आॅक्टोपॅड अभिजित शर्मा, की-बोर्ड अनिल धुमाळ, ध्वनी पराग जोशी यांनी तेवढ्याच ताकदीची साथसंगत केली. प्रास्ताविक वैशाली बालाजीवाले यांनी केले. यावेळी हरीश बालाजीवाले, नगरसेवक शाहू खैरे, मोनालिसा दिवेकर, किशोर पाठक, सि. ल. कुलकर्णी आदी उपस्थित होते.शब्दसुरांची बरसात‘सरला जरी मनाने ऋतू आज पावसाचा’ या गीताला गायक पुष्कराज भागवत याने बहार आणली. ‘ये खुशाल सजवाया देहाच्या सोहळ्यास’, ‘पावसाला ही तसे हे चांदणे सलतेच आहे ’, ‘तुझा माझ्या देहावर माळूनिया रंग’, ‘मी पेटवले मन माझे पाऊस बरसला जेव्हा’, ‘जागा कुणा दिलाची देऊ नकोस राजा’ अशा एकापेक्षा एक सुंदर पाऊसगीतांनी रसिकांना शब्दसुरांच्या बरसातीने अक्षरश: चिंब भिजवले पुष्कराज भागवत यांनीही सुमधुर गिते सादर केली.
सुमधुर पाऊस गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:32 AM