नाशिक : ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘पानी पानी रे’, ‘नाम गुम जायेगा’, यांसारख्या गीतकार गुलजार यांच्या एकापेक्षा एक सरस गाजलेल्या गीतांची मोहिनी नाशिककरांमध्ये पहावयास मिळाली.निमित्त होते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गीतकार राम पुरणसिंह कालरा ऊर्फ गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘जिंदगी गुलजार हैं’ या मैफलीचे. शनिवारी (दि.१८) रंगलेल्या या मैफलीत उपस्थित श्रोत्यांच्या मनावर असलेले गुलजार यांच्या रचनांचे गारुड पहावयास मिळाले. गायक रागिणी कामतीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गुलजार यांनी रचलेल्या हिंदी गीतांच्या रचना सादर करून मैफल उत्तरोत्तर खुलवत नेली. त्यांना सहगायक नेहा मूर्ती यांनी सुरेख साथ केली.‘मैं इक सदी से बैठी हूँ’ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘हमने देखी हैं उन आँखो की खुशबू’ हे गीत सादर करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतरच्या ‘मेरी मां मुझे जा ना कहो’, ‘वो शाम कुछ अजीब थी’, ‘ना जिया लागे ना’, ‘तुम पुकारलो’, ‘रु के रु के से कदम’, ‘दोन नैनों में आंसू भरे हैं’, ‘सूरमयी अँखियों में’, ‘आप की आँखो में कुछ’, ‘मेरा कुछ सामान’ अशा गीतांनी मैफलीत रंग भरले. आदित्य कुलकर्णी (तबला), अॅड. प्रमोद पवार (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन केले.
गीतकार गुलजार यांना वाढदिवसानिमित्त स्वरमयी शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:01 AM