देवगांव (नाशिक) : केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार "हर घर टीका, हर घर दस्तक" या अभियानाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातून प्रारंभ झाला. कोरोना लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असून खेड्या-पाड्यांत महत्वाचं ठरणार आहे. या अभियानांतर्गत लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांची यादी तयार करून प्रत्येकाचे लसीकरण केले जाणार आहे. तालुक्यात गरजेनुसार प्रत्येक गावात लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.
या अभियानाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथून प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेगलवाडी येथील घराघरांत जाऊन या अभियानाला सुरुवात झाली.
गावातील एका घरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरण पथकाने विशेष केंद्र सुरू केले. लसीकरणापासून वंचित असलेल्यांना यावेळी लस देण्यात आली. या अभियानाबद्दल विशेष जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ भारती पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केले. तसेच काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री कपिल पाटील व खासदार पितम मुंडे यांनी लसीकरणाबाबत जनजागृती मध्ये सहभाग नोंदवला.
लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोतीलाल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनेरीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा सोनवणे, डॉ आशिष सोनवणे, तालुका पर्यवेक्षक श्री राजेंद्र भानुसे, आरोग्य सेवक किशोर अहिरे, अमोल बागुल, संजय चव्हाण, अपसुंदे आरोग्य सेविका श्रीमती केदारे, श्रीमती मिंदे तसेच गावात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक ग्राम आरोग्य अधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.