पंचवटी : हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष करीत सोमवारी (दि.४) शेकडो भाविकांनी पंचवटीतील गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात शेकडो भाविकांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान महादेवाचे दर्शन घेतले.महाशिवरात्रीनिमित्ताने परिसरात असलेल्या शिवमंदिरांत सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगाघाटावरील श्री कपालेश्वर, नारोशंकर तसेच सिद्धेश्वर व अन्य ठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या पालखीत श्रींचा पंचमुखी चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता. पालखी सरदार चौकातून गंगाघाटापर्यंत काढण्यात आली त्यानंतर रामकुंड येथे पालखीचे विधिवत पूजन व अभिषेक करण्यात येऊन पालखी मिरवणुकीचा कपालेश्वर मंदिरात समारोप करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पुरातन नारोशंकर मंदिरातही भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी मंदिरात पूजा अभिषेक करण्यात आला, तर घारपुरे घाटावरील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या.महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी पहाटे ५ वाजता महादेवाच्या पिंडीवर गुरवांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती पूजन झाले. दुपारी महापूजा व पालखी मिरवणूक काढण्यात आली.
हर हर महादेव...बम बम भोलेचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:30 AM