---
सार्वजनिक ठिकाणी उपद्रव भोवला
नाशिक : मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणे वाजवून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्याविराेधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजित कुमार यादव (२३, रा. घाटोळ मळा, सातपूर) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयिताचे नाव आहे. धुलिवंदननिमित्त घाटोळ मळा परिसरात परप्रांतीय तरुणांनी मोठमोठ्या आवाजात गाणे वाजवून ध्वनिप्रदूषण केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला यामुळे सातपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
----
तडीपार आरोपींचा वावर वाढला
पंचवटी : पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपयुक्तांच्या आदेशानुसार अनेक गुन्हेगारांना नाशिक शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. तडीपार केलेले संशयित पंचवटीत खुलेआम वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. तडीपार केलेले असतानादेखील सराईत गुन्हेगार सर्रासपणे फिरत असून, पंचवटी पोलिसांना मात्र त्याचा सुगावा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
---
बोरगडला ३० हजाराची घरफोडी
नाशिक : बोरगड परिसरातील एकतानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉप, एलईडी टीव्ही आणि कॅसिओ असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिक एवाजी चौधरी (रा. रामय्या सोसा. एकतानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी कुटुंबीय २७ ते २९ मार्चदरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी हॉलमधील लॅपटॉप, एलईडी टीव्ही आणि कॅसिओ असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला.
---