मालेगाव : बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात बकरी ईद सण काळात विशेष कक्ष उभारला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. पोलिसांची सामान्य नागरिकांसोबत वर्तणूक चांगली असेल तर कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल हेच माझ्या कामाचे सूत्र आहे. निर्भिड व निपक्ष कारवाईला प्राथमिकता दिली जाईल. ईद काळात कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महसूल, मनपा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलीस कवायत मैदानाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात विशेष कक्ष सुरू केला जाणार आहे. या कक्षात महसूल, पोलीस, पशुसंवर्धन विभाग, अग्निशमन व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कुर्बानीसाठी एक कायमस्वरूपी व चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यांचा वापर करावा. उघड्यावर कुर्बानी देणाºयांवर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणकाळात २१ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल असलेल्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेतही निलोत्पल यांनी दिले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. बाहेरगावाहून पोलिसांची अधिकची कुमक मागविण्यात येणार आहे. यात तीन पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ३० दुय्यम अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, दोन दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, ३३० गृहरक्षक दलाचे जवान, ४० गृहरक्षक दलाच्या महिलांचा समावेश राहणार आहे. शहरातील नागरिकांनी शांततेत बकरी ईद सण साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.
मालेगावी बकरी ईदसाठी कडक पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:20 PM