सिन्नर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हरियाली पाणलोट योजनेअंतर्गत कणकोरी ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी मिळालेल्या १७ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीचा तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह १३ जणांनी अपहार केल्याची तक्रार पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी संशयित १३ जणांविरोधात शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या हरियाली योजनेत सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावाचा समावेश करण्यात आला होता. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून राबविल्या जाणाऱ्या हरियाली योजनेत कणकोरी गावाच्या विकासासाठी शासनाने निधी दिला होता. योजनेचा निधी ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र बॅँकेच्या खात्यावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जमा केला होता. या योजनेत कामे न करता पैसे काढून घेतल्याची तक्रार तत्कालीन सरपंच पार्वताबाई आहिरे, रामनाथ सांगळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बुचकूल यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे केली होती. या तक्रारी अर्जाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती. याप्रकरणी कृषी अधिकारी कैलास भदाणे, कृषी विस्तार अधिकारी एस. डी. गोसावी व ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे यांच्या समितीने चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. चौकशी अहवाल आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे यांना सूचना केली होती. त्यानुसार भदाणे यांनी कणकोरीच्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकासह १३ जणांविरोधात वावी पोलीस ठाण्यात शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फिर्याद दिली.पोलिसांनी तत्कालीन सरपंच पार्वताबाई आहिरे, तत्कालीन उपसरपंच अनिल दत्तात्रय सांगळे, तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र नामदेव ठोंबरे यांच्यासह मारुती एकनाथ चकणे (मानोरी), धनंजय शिवाजी जगताप व अनिल शिवाजी बुचकूल (दोघे रा. कणकोरी), नवनाथ भागवत गायकवाड, संचित खंडेराव शेळके, रमेश मोगल साळवे, किशोर रमेश साळवे, प्रतीक दीपक बोऱ्हाडे, मेहमूद भिकनभाई तांबोळी व अनंत नानासाहेब घुले (सर्व रा. नांदूरशिंगोटे) यांच्याविरोधात संगनमताने हरियाली योजनेची रक्कम ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र बॅँकेच्या खात्यातून काढून विकासकामे न करता तसेच कोणत्याही प्रकारे अभिलेख नोंदी न ठेवता चेकद्वारे वेळोवेळी काढून निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
हरियाली योजनेत १७ लाखांचा अपहार
By admin | Published: March 10, 2016 10:48 PM