नाशिकरोड : परिसरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी परिसरातून दिंडी काढून भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पूजन करण्यात येऊन परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी व टाळ-मृदंग घेऊन वारकरी वेशात सर्व विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. छाया जाधव यांनी आषाढी एकादशीची माहिती सांगितली. शोभा गरूड यांनी ‘किती किती आनंद रे पांडुरंगा’ हे भजन म्हटले. तसेच विद्यार्थिनींनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर केला. यावेळी सुनीता सोनगिरे, सुरेखा पाटील, जयश्री भडके, मानसी झनकर, कल्याणी कुºहे, निर्मला दिवेकर, अरुण काळे आदींसह शिक्षक व पालक उपस्थित होते.नगरकर गुरुकुलनगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. डावखरवाडी ते जयभवानीरोड या परिसरातून काढलेल्या दिंडीत विद्यार्थिनी लेजीम नृत्य करत सहभागी झाल्या होत्या. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा, ‘वाचाल तर वाचाल’ अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभुषा केली होती. वृक्षदिंडीत मुख्याध्यापिका संगीता पाटील, विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले होते.
नाशिकरोड परिसरात शाळांमध्ये हरिनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 AM