चांदवड : कोणताच खेळाडू हा मेहनतीशिवाय आणि पाठिंबा असल्याशिवाय ध्येय गाठू शकत नाही खरे यश हे मनाला आनंद देते. खेड्यापाड्यातून खेळाडू यांना मदत व सहकार्य मिळाले तर नक्कीच खेळाडू त्या पाठिंब्यावर आपलं विश्व निर्माण करू शकतात. दानशूरांनी यापुढे सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परीने खेळाडूंंना मदत करा असे आवाहन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी वडाळीभोई येथे आयोजित कुस्ती स्पर्धा उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड हे होते. वडाळीभोई शिवसेनेच्या वतीने हर्षवर्धन सदगीर यांनी नाशिकला महाराष्ट्र केसरी गदा व बहुमान मिळवून दिल्याबद्दल कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक कारभारी आहेर यांनी केले. यावेळी महिला सटाणा येथील आहिरे आणि वडाळी येथील मांदळे या कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंच म्हणून गंगा जाधव, भाऊसाहेब मार्कंड, नितीन कातोरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी बापू आहेर, अशोक शिंदे, वसंत आहेर आदी शिवसैनिक व वडाळीभोई ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
वडाळीभोईला हर्षवर्धन सदगीर, धर्मा शिंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:19 PM