नाशिक-नाशिकला महाराष्टÑ केसरी मिळवून देणाऱ्या भगुर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगिर यास महापालिकाचा सदिच्छा दूत (ब्रॅँड अॅम्बेसेडर) करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सदगीर याचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे नियोजन देखील महापालिकेने केले आहे. येत्या २८ जानेवारीस हा सत्कार करण्याचे नियोजन आहे.
हर्षवर्धन सदगिर हा मुळचा अकोला तालुक्यातील असला तरी तो तालीमीसाठी भगूरच्या बलकावडे व्यायामशाळेत दाखल झाला आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक कुस्त्या खेळल्या. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत लातूरचा पहिलवान शैलेश शेळके याचा त्याने पराभव करून महाराष्टÑ केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे नाशिकच्या क्रिडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षवर्धन यांस नाशिकचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिनकर पाटील, शाहु खैरे आणि संजय चव्हाण यांनी दिला आहे. शनिवारी (दि.१८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे वाचन करण्यात आले त्यानंतर त्यास मान्यता देतानाच सदगीर यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने सदगिर यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजन अगोदरच करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील गठीत करण्यात आली आहे.