नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याबरोबरच आदिवासींना त्यांच्या वनहक्क दाव्यांबाबतची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासह विविध मागण्यांसाठी शनिवार (दि.१४) हरसूल येथे माकपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माकपच्या या रास्ता रोको आंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.शनिवारी (दि.१४) सकाळी सात वाजेपासूनच हरसूलला माकपाच्या वतीने हरसूल येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. ते रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे प्रांत बाळासाहेब वाकचौरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माकप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करावा, प्रत्येक गावात सरकारी भावात शेतीमालाची खरेदी सुरू करावी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यानुसार आदिवासींना वनहक्क कायद्यान्वये जमिनींचे वाटप करावे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची दुरवस्था दूर करून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा द्याव्यात. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दोन रुपये किलो दराने धान्य मिळाले पाहिजे, रेशन कार्ड नसलेल्यांना तत्काळ नवीन रेशन कार्ड देण्यात यावे, कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यांसह विविध मागण्यांचा प्रांत बाळासाहेब वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व इरफान शेख, रमेश बरफ, तुकाराम मोंढे, हरदास मौले, भगवान चौधरी, शिवाजी तिदमे, भगवान बेंडकुळे, वेद काळू यांनी केले. रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. (प्रतिनिधी)
हरसूलला माकपचा रास्ता रोको
By admin | Published: November 14, 2015 11:18 PM