पंचवटी : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्वच रेशन दुकानदार संघटनेने १ जुलैपासून धान्य उचलणार नाही आणि धान्य आले तरी ते वितरण करणार नाही, अशी माहिती आॅल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. रेशन दुकानदारांकडे शासनाचे लक्ष वेधावे यासाठी संपूर्ण राज्यातील रेशन दुकानाबाहेर तसेच एस.टी. बसेसवर पत्रक चिटकविण्यात येणार आहे. राज्यात जवळपास एक लाख पाच हजार रेशन व केरोसिन परवानाधारक आहेत. शासन धान्य देत असले तरी ते गोरगरिबांपर्यंत पोहचत तर नाहीच शिवाय दुकानदारांना नफा मिळत नाही. नफ्यापेक्षा वाहतूक खर्च जास्त येत असल्याने दुकानदारांना शासनाने चतुर्थ कर्मचारी श्रेणीत सामावून घ्यावे किंवा शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात शासनाचे रेशन दुकान सुरू करावे. परवानाधारकांची प्रलंबित थकीत असणारी रक्कम शासनाकडून मिळावी, तसेच १ जानेवारी ते जून २०१५ पर्यंत धान्य वेळेवर मिळालेले नाही त्यामुळे परवानाधारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये अंतर्गत परवानाधारकांना द्वारपोच योजनेद्वारे धान्याचा कोठा मिळाला पाहिजे तो मिळत नाही, असे बाबर यांनी सांगितले. शासनाकडे वेळोवेळी मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे व धान्य न उचलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान, प्रारंभी नाशिक जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार, हॉकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेच्या राज्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी व परवानाधारकांचा दिंडोरीरोडवरील अमरापूरधाम येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला बाबूराव ममाणे, गणपत डोळसे पाटील, जमनादास भाटिया, शहाजी लोखंडे, आप्पासाहेब तोडकरी, विजयकुमार हिरेमठ, अशोक एडके, येवाजी भोये, भगवान जाधव आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
जुलैपासून धान्य उचलणार नाही
By admin | Published: June 15, 2015 1:37 AM