नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते किंवा नाही, हे तपासणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने काही व्यक्ती अनावधानाने तर काही व्यक्ती काहीच होत नाही, अशा अतिरेकी आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच केंद्राबाहेर पडतात. त्यानंतर काही अंतर जाण्यापूर्वीच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, घाबरल्यासारखे होते. रस्त्यावर अशावेळी कोणतीही घटना घडू शकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी किमान अर्धा तास लसीकरण केंद्राबाहेर पडू नये, हे निर्बंध कायम असून नागरिकांनी स्वत:च ते पाळणे आवश्यक असल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.
देशात कोरोनाबाबतच्या लसीकरणाला वेग देण्यात आला असून, हळूहळू राज्याला लस मिळण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रांवर पुन्हा नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.
सरकारनं जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार लसीनंतर प्रत्येक नागरिकाने केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे. तसेच लस घेतल्यानंतर दिवसभरात एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. पण, अशावेळी घाबरून न जाता नागरिकांनी काय करावे, हेदेखील जाहीर करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, १० टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लसीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावे लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या केंद्रातच ही पर्यायी व्यवस्था तसेच स्वतंत्र डॉक्टर्स उपलब्ध असतात.
शासकीय प्रोटोकॉलनुसार तिथे आवश्यक ते उपचार केले जातात.
इन्फो
समितीच्या शिफारशी बंधनकारक
एईएफआय (अॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायझेशन) असे या समितीचे नाव असून, कोरोना लसीकरणाशी संबंधित देशात झालेल्या मृत्यूच्या प्रारंभीच्या काही घटनांनंतर या समितीने तिचे निकष आणि निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. त्यामुळेच लस घेतल्यानंतर काही दुष्पपरिणाम होत आहेत का, हे तपासण्यासाठीच तिथे अर्धा तास थांबणे आवश्यक असते, असे या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
इन्फो
लस हेच औषध
जिल्ह्यात दोन्ही लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकाचा लसीकरणामुळे मृत्यू झालेला नाही. काहींना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच औषधोपचार करून ते बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लस हेच औषध असल्याचे सिद्ध झाले आहे.
--------------
ही डमी आहे.