नाशिक : नाशिकरोड विभागात गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवार, दि. ३ रोजी यात आणखी वाढ होणार आहे. मात्र गेल्या दोन दिवसांचा विचार करता यातील अर्ज दाखल केलेल्यांची नावे पाहता ‘यांची अजूनही हौस फिटलीच नाही का?’ असाच सूर मतदारांमध्ये उमटत आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र अर्ज दाखल केलेल्या अनेक अपक्षांमध्ये गमतीशीर नावे आहेत. यामध्ये सर्वच राजकीय पक्ष फिरून आलेले, पडण्याचा विक्रम केलेले, आमदारकी लढलेले, फक्त निवडणुकीलाच उगवणारे अशी सारी जंत्रीच पुढे आल्याने मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. कालपर्वापर्यंत राजकारणातून संन्यास घेतल्यागत वागणाऱ्यांना अचानक लोकसेवेचा उमाळा आला आहे. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्यांनी राजकीय पक्षही हाताशी ठेवले आहे. त्यांच्याकडून आपण अमुक पक्षाचे उमेदवार असल्याचा प्रचार करण्यात आला आहे. मात्र पक्षांनी अशांना अजूनही दूरच ठेवले आहे. तरीही या बहाद्दरांनी अपक्षाची ढाल पुढे केली आहेच. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये काही अगदी पहिल्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढलेलेदेखील आहेत. म्हणजेच पहिल्या पंचवार्षिकपासून ते आत्तापर्यंत ते प्रयत्नच करीत आहेत. यातील काहींना पहिल्या पंचवार्षिकमध्ये यश आले मात्र नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारलेले असतानाही त्यांची अजूनही हौस फिटलेली नाही. काही इच्छुक तर आमदार, खासदार आणि पुन्हा नगरसेवक असा प्रवास करुन पुन्हा गुडघ्याला बाश्ािंग बांधून आहेत. पडण्याचा विक्रम करण्याचा चंग त्यांनी अजूनही सोडलेला नसल्याची टीका त्यांच्याबाबत होऊ लागली आहे. एका पक्षाचे नाशिकरोडमधील अध्यक्षही प्रत्येक वेळेला स्वत:साठी तिकीट राखून ठेवतात. मात्र त्यांना अजूनही पालिकेचे तिकीट मिळविता आलेले नाही. (प्रतिनिधी)
अजूनही हौस फिटेना; पुन्हा तेच चेहरे
By admin | Published: February 03, 2017 12:59 AM