नाशिक : राष्टय फेरीवाला धोरणांतर्गत ग्राहक व नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हॉकर्स झोन तयार करावेत यासह फेरीवाल्यांविरुद्ध होणारी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. युनियनच्या वतीने विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, महापालिकेने फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आहेत. असंख्य फेरीवाल्यांची नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाल्यांच्या नोंदणीचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. फेरीवाल्यांची नोंदणी फी व दैनंदिन फी याची निश्चिती करावी. हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनचा आढावा घेऊन संघटनेने सुचविलेल्या पर्यायांवर विचार करून त्याची अंमलबजावणी करावी. महापालिकेने आजवर जप्त केलेला फेरीवाल्यांचा माल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परत करावा आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम विभागीय कार्यालयामार्फत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा निषेध करण्यात आला तसेच सदर कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सुनील संधानशिव, रामभाऊ चव्हाण, शकुंतलाबाई शिंदे, चंद्रकला पारवे, जयाताई पटेल, नारायण धामणे, नीलेश कुसमोडे आदींसह हॉकर्स व टपरीधारक सहभागी झाले होते.
महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर हॉकर्स, टपरीधारकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:47 AM