नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’ काढण्यात आला.जुने नाशिकमधील चौकमंडई येथून बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने ‘जुलूस-ए-हुसेनी’ची मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, चव्हाटा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातून पिंजारघाटमार्गे बडी दर्गाशरीफच्या प्रारंगणात पोहचली. यावेळी फातिहा पठन करुन मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. मिरवणूकीमध्ये सुन्नी दावते इस्लामी, दावते इस्लामी, मदरसा गौस-ए-आझम, मदरस सादिकुल उलूम यांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. अग्रभागी आकर्षक सजावट केलेली चादर चे वाहन होते. हाजी सय्यद मीर मुख्तार सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती ध्वनिक्षेपकावरून देत होते.