फिर्यादी जोत्स्ना गोविंद जंगले (६०,रा. प्रभुप्रसाद अपार्टमेंट, शिर्के मळा) या त्यांच्या राहत्या घराजवळ चारचाकी वाहन उभे करण्यासाठी गेले असता अपार्टमेंटपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी या जबरी लुटीत ८५ हजारांची सोनसाखळी व ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापूररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदी भागात नाकाबंदीच्या सूचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.
--इन्फो--
नववर्षात पुन्हा पोलिसांपुढे आव्हान
सोनसाखळी चोरी करणारी टोळी नववर्षात पुन्हा शहरात सक्रिय होऊ लागली असून, शहर पोलिसांपुढे या टोळीला बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आडगाव, मुंबई नाका आणि आता गंगापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच दिवसांपासून सलग चोरीच्या घटना घडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.