नाशिकरोड : जेलरोड पिन्टो कॉलनी येथे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याकडे कामानिमित्त आलेल्या एका व्यापाऱ्याच्या कारची पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून सीटवर ठेवलेली नऊ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंदनगरजवळील कर्मयोगीनगरमधील रहिवासी ओजस दीपक शहा यांचा स्टील व सिमेंट विक्रीचा धुळे-चाळीसगाव रोड व नांदूरनाका येथे व्यवसाय आहे.
शहा यांनी बुधवारी दुकानातून नऊ लाखांची रोकड एका पिवळ्या रंगाच्या टिफीन बॅगमध्ये ठेवली आणि आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या (एमएमच१५ जीएफ ७३४५) पुढील डाव्या बाजूच्या सिटवर बॅग ठेवली. दिवे यांच्याकडे काम असल्याने नांदुरनाका येथील दुकानातून ते जेलरोड पिन्टो कॉलनीतील दिवे यांच्या कार्यालयाजवळ रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास आले. त्यावेळी त्यांनी गाडी रस्त्यालगत उभी करून घरात गेले असता, दोन लहान मुले यांच्याकडे आली आणि म्हणाली ‘तुमच्या गाडीची काच फोडलेली आहे’ शहा हे तत्काळ गाडीजवळ गेले असता चोरट्यांनी पाळत ठेऊन गाडीच्या डाव्या बाजूची पुढील दरवाजाची काच फोडून नऊ लाखांची रोकड लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी त्वरित उपनगर पोलिसांना याबाबत माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच गस्ती पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी करून तपास सुरू केला. यापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.