पंचवटी : गेल्या मंगळवारी गोदावरीला आलेल्या पुरामुळे झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा पूर आल्याने अनेक बेघरांनी गणेशवाडीतील भाजीमंडईचा आधार घेत तेथेच चूल मांडल्याने मनपाची भाजीमंडई सध्या बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. मंगळवारी आलेल्या पुरामुळे गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांच्या झोपड्या, पाल वाहून गेले. पावसाचा मारा सुरूच असल्याने या शेकडो बेघरांना लपंडावचा खेळ खेळावा लागला. पूर आल्याने काहीकाळ मनपाच्या भाजीमंडईचा आधार घेतला खरा, पण दुपारी पुराच्या पाण्याने भाजीमंडईला कवेत घेतल्याने बेघरांची पळापळ झाली. गुरुवारी पाऊस उघडल्याने व पुराचे पाणी ओसल्यानंतर या बेघरांनी पुन्हा नदीकाठी झोपड्या, पाल टाकले मात्र शनिवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची दाणाफाण उडाली. रात्रीतून जायचे कोठे म्हणून पुन्हा या बेघर कुटुंबांनी लहान मुले, भांडी, कपड्यांची गाठोडी उचलून मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता गाठला. सध्या या बेघरांनी भाजीमंडईलाच घर मानून तेथेच चूल पेटवित दाटीवाटीने संसार मांडला आहे. महापालिकेने भाजीविक्रे त्यांसाठी बनविलेल्या सर्वच ओट्यांवर या बेघरांनी सहारा घेतला असल्याचे चित्र सध्या भाजीमंडईत दिसून येत आहे. पुरामुळे भाजीमंडईत संपूर्ण गाळ व चिखल साचल्याने तेथे उघड्यावर संसार मांडलेल्या शेकडो बेघरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘त्यांनी’ भाजीमंडईतच थाटला संसार
By admin | Published: August 07, 2016 10:35 PM