यंदा कोरोनाचे संकट गावागावात पोहोचले आहे. अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामीण भागात त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. अशाही परिस्थितीत अनेक शेतकरी निष्ठेने शेतीची कामे करीत आहेत. निवृत्ती दुनबळे यांच्याकडे स्वत:ची शेती नाही त्यांनी आपल्या चुलत्याची शेती निम्यावाट्याने कसावयास घेतली आहे. यावर्षी त्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली. काही क्षेत्रांत गहूही पेरला. पीक ऐन मोसमात आले असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. अंगात ताप भरला, हातपाय दुखू लागले, घशात खवखव होऊ लागली ही सगळी कोरोनाची लक्षणे त्यांना दिसू लागली पाठोपाठ पत्नीही आजारी झाली, पण ते डगमगले नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष करत शेतीची कामे करत राहिले, फक्त कुणाच्या संपर्कात न जाण्याचा नियम त्यांनी पाळला. याचदरम्यान त्यांची आईही आजारी झाली त्यांना जी लक्षणे दिसत होती तीच त्यांच्या आईलाही दिसत असल्याने त्यांनी आईला दवाखान्यात नेले चाचणी केल्यानंतर त्यांची आई पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही निवृत्ती यांनी धीर न सोडता. गरम पाणी पिणे, वाफ घेणे आणि गावातील आशा वर्करकडून मिळणाऱ्या गोळ्या घेतल्या. यावरच त्यांना बरे वाटू लागले. आज ते पूर्णपणे ठणठणीत असून, आजारपणातही घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. त्यांना कांद्याचे चांगले उत्पन्न मिळाले आहे, शिवाय १५ पोते गहूही पिकला आहे. कोरोनाने खचून न जाता जिद्दीने त्यांनी शेतीची कामे केली याचा त्यांना चांगलाच लाभ झाला. विशेष म्हणजे गावातील इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत त्यांचे उत्पन्न अधिक आहे.
कोरोनाला न घाबरता त्याने पिकविला ३०० क्विंटल कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:15 AM