नाशिकरोड : नोकराला राहण्यास दिलेला बंगला बनावट कागदपत्रे तयार करून तो बंगला विकत घेतल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोड, दातेनगर येथील प्रशांत अरुण संघई यांचा लोखंडी पत्रे खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे २००३पासून नीलेश चिंतामण दुदंडे (रा. दीपनगर, रो हाऊस) हा सेल्समन म्हणून कामाला होता. काम करत असताना काही महिन्यांनी नीलेशची राहण्याची अडचण निर्माण झाल्याने त्याने मालक प्रशांत यांना अनेक विनवण्या करून त्यांच्या अगर टाकळी भागातील रिकाम्या असलेल्या बंगल्यात राहण्यास गेला. मात्र, २००८मध्ये नीलेशने प्रशांत यांच्याकडील काम सोडल्याने प्रशांत यांनी नीलेश याला बंगला खाली करण्यास सांगितले. मात्र, नीलेशने न्यायालयात खोटा दावा दाखल करून त्या बंगल्याच्या हस्तांतराचा बनावट दस्त तयार केला. तू बंगला माझ्याकडून खरेदी करत असल्याचे लबाडीने दाखवून तो खोटा दस्तऐवज खरा वाटावा म्हणून बँकेमार्फत स्टॅम्प ड्युटीदेखील भरली. मात्र, त्यानंतर जिल्हा निबंधक वर्ग १ यांच्याकडे भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी अर्ज केला. कौटुंबीक अडचणीमुळे खरेदीचा व्यवहार रद्द करत असल्याचे अर्जात म्हटले होते. बँकेमार्फत भरलेली स्टॅम्प ड्युटी ही शासनाकडून पुन्हा मिळविली. प्रशांत संघई तो बंगला खाली करून घेण्यासाठी गेले असता नीलेश याने त्यांचा रस्ता अडवून दमदाटी करून हा बंगला माझा आहे, असे सांगितले. खोटे दस्तऐवज बनवून ते खरे असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकराला राहायला दिलेला बंगला त्याने केला स्वत:च्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 1:14 AM
नोकराला राहण्यास दिलेला बंगला बनावट कागदपत्रे तयार करून तो बंगला विकत घेतल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देफसवणुकीचा गुन्हा दाखल : बनावट कागदपत्रे केल्याचा आरोप