नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पंचवटीत रामकुंडाकडे मालेगाव स्टॅँडकडून येण्यासाठी आणि जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम जोमाने हाती घेतले आहे. तथापि, सदरचे काम हे भाविकांच्या सोयीसाठी करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून, त्यामुळे मालवीय चौकातील रुंदीकरण टाळण्यासाठी हे काम करीत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने रिंगरोड, चार पूल आणि शाही मार्गाचे रुंदीकरण ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण करण्यात येत असून, त्याअंतर्गतच सध्या मालेगाव स्टॅँडजवळ म्हणजे गोसावी समाजाची दफनभूमीलगत असलेल्या पायऱ्या काढून केवळ सरळ रस्ता तयार केला जात आहे. शाही मार्गाचे रुंदीकरण करताना कपालेश्वर मंदिरापासून खांदवे मंगल कार्यालय ते मालवीय चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. तथापि, स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्यास विरोध आहे. त्यामुळे पंचवटी वाचनालयाचा हा नवा मार्ग म्हणजे परतीच्या शाही मार्गाला पर्याय असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. साधू-महंतांशी चर्चा न करता तसे लोकप्रतिनिधींनी परस्पर जाहीर केले होते. तथापि, शहर अभियंता सुनील खुने यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मालेगाव स्टॅँडला पर्यायी मार्ग आहे. मालेगाव स्टॅँडकडून रामकुंडाकडे येण्यासाठी तीव्र उतार आहे. तसेच परतताना चढ तर आहेच; परंतु लगेचच सिग्नल आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. गेल्या कुंभमेळ्यात तर दुसऱ्या पर्वणीच्या वेळी या भागातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांमध्ये गर्दी होऊन चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली होती. नियोजित रस्ता रुंदीकरणाचा या मार्गाशी कोणताही संबंध नसल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘तो’ शाही मार्गाला पर्याय नव्हे!
By admin | Published: October 30, 2014 11:37 PM