नाशिक : शरीराने अजस्त्र मात्र कधी शांत, तर कधी आक्रमक स्वभाव धारण करणारा शाकाहारी वन्यप्राण्यांपैकी एक रानगवा प्रथमच शहराच्या जवळ पाथर्डी शिवारात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला रानगवा नर हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून वाट चुकल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या अभयारण्यात दोन गव्यांचे वास्तव्य अनेकांना आढळून आल्याचे वन्यजीवप्रेमींसह स्थानिक वन अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात रानगव्याचे वास्तव्य मागील दोन वर्षांपासून आढळून येत आहे. या अभयारण्यातील राजूर व भंडारदरा वनपरिक्षेत्रातील साम्रद, घाटघर, रतनवाडी आदी गावांमध्ये दोन रानगव्यांची भटकंती अनेकांनी बघितली आहे. पावसाळ्यात रानगवे भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्याच्या गावांमध्ये दिसून येत होते. त्यानंतर त्यांनी वास्तव्याचे ठिकाण बदलून राजूर वनपरिक्षेत्रातील रंधा गावापासून पुढे स्थलांतर केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. हा प्राणी अत्यंत शक्तिशाली असून, शक्यतो पायी भटकंती करतो; गरज पडल्यास प्रचंड वेगानेदेखील धावू शकतो. पाळापाचोळा, रानगवत खाऊन रानगवा जगतो. वेळेप्रसंगी वाघालाही पिटाळून लावणारा व चारचाकी मोठे वाहनही उलथविण्याची ताकद ठेवणारा गवा हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वास्तव्यास असल्याची नोंद आहे. या अभयारण्यातून भंडारदरा, इगतपुरीमार्गे सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्यावरून वाट भरकटल्याने रानगवा पाथर्डी शिवारात पोहचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन महिन्यांपूर्वी आंबेवाडीत दर्शननाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील आंबेवाडी भागातील जंगलाच्या परिसरात नर रानगव्याने दर्शन दिले होते. आंबेवाडीत आठवडाभरापेक्षा अधिक दिवस वास्तव्यास रानगवा होता. इगतपुरीमध्ये दर्शन देणारा गवा पाथर्डीत पोहचल्याची शक्यता इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे यांनी वर्तविली.
‘तो’ रानगवा हरिश्चंद्रगड अभयारण्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:34 AM