दुपारी बारा ते एक वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने पंचवटी परिसरातील सर्वच मुख्य रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने काही रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य होत आहेत. एरव्ही दिवसभर नागरिक आणि वाहनांच्या वर्दळीने फुलणारे मुख्य रस्ते उन्हामुळे ओस पडत चालल्याने मुख्य रस्त्यावर काहीकाळ शुकशुकाट होत असून, उन्हामुळे नागरिकदेखील घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहे. दुकाने व बाजारपेठेत दुपारी ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारपेठेत दुपारच्या वेळी शांतता पसरत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाच्या चांगल्याच झळा सहन कराव्या लागत असल्याने विविध वस्तू विक्री करणारे हातगाडीधारक, फेरीवाले देखील रस्त्याच्या लगत झाडाच्या सावलीचा आधार घेत असल्याचे बघायला मिळते.
उन्हाळ्यात थंडगार उसाच्या रसाला मागणी असल्याने ऊस रस विक्रेत्यांनी रसवंत्या थाटलेल्या आहे तर फिरते रसवंतीवाले गल्लीबोळात फिरतांना दिसतात. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री, टोपी परिधान करत असल्याचे दिसून येते. वाढत्या उन्हामुळे दिंडोरीरोड, पेठरोड, गंगाघाट परिसर, मेनरोड, रविवार कारंजा भागातील रस्त्यावर दुपारच्या सुमाराला शुकशुकाट पसरतो तर सायंकाळी सात वाजेनंतर मनपा उद्यानात लहान मुले तसेच नागरिकांची गर्दी होत असल्याचे बघायला मिळते.