नाशिक : द्वारका येथे तीन दिवसांपूर्वी चालत्या कारवर दगडफेक करत कार थांबताच कारमधील युवकांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. टोळक्यातील तिघांना भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचा एक साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सोमवारी (दि.२५) द्वारका परिसरात चौघा हल्लेखोरांनी मिळून दबा धरून एका कारच्या काचेवर दगडफेक केली. कार थांबताच चौघांनी कारमधील तिघा युवकांना बाहेर काढून बांबूने मारहाण करत एकाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून गंभीर दुखापत करत पलायन केले होते. प्रतीक रोहित मदन (वय २४, रा. सावरकरनगर) या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी तपासचक्रे फिरविली. गुन्हे शोध पथकाचे हवालदार युवराज पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाेलिसांच्या पथकाने संशयित अरबाज अहमद शेख, मुजमिल मोहिदीन शेख, इम्तियाज अली शेख अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे गुरुवारी हजर कले असता, न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि.३०) पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास उपनिरीक्षक गवळी करत आहेत.
अंकित मदन यांना बांबूने मारहाण करीत गंभीर दुखापत केली होती. कारचे नुकसान करीत चोरट्यांनी अंकितकडील ८० हजार रुपयांची अडीच तोळे वजनाची चेन काढून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार यांनी पथक नेमले. पथकाने तपास करून तिघांना पकडले असून, एक संशयित फरार आहे. न्यायालयाने या तिघांनाही शनिवारपर्यंत (दि.३०) पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक गवळी, अंमलदार युवराज पाटील, कय्युम सैयद, उत्तम पवार, संजय पाेटिंदे, गोरख साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.