त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली. सोमनाथ नगर येथील शाळा इमारतीच्या अर्धवट बांधकामाचा विषय होता. त्यावेळेस ते काम आम्ही केले नसून ग्रामपंचायतीने केले आहे.
आम्ही केले नाही असे इमारत व दळणवळण विभागाचे उपविभागीय अभियंता शिरसाट यांनी सांगितल्याने आमदार संतापले. ते म्हणाले काम कोणीही करो, पण तुमच्याच अखत्यारीत येते ना ? उगीच सर्व जबाबदारी तुमची असताना ग्रामपंचायतीवर खापर फोडणे योग्य नाही. म्हणून प्रत्येक खातेप्रमुखाने कामाची गुणवत्ता टिकावूपणा पाहावा. उगीच आपली जबाबदारी झटकून टाकू नये, अशी तंबी खोसकर यांनी दिली.खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव, सहायक गटविकास अधिकारी पाठक, माजी जि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे, विनायक माळेकर, संतोष डगळे, रवींद्र भोये, जयराम मोंढे, मधुकर झोले आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक एकस्तर वेतनश्रेणी दप्तर दिरंगाईची तक्रार शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली. संबंधित महिला लिपिक यांनी याबाबत उत्तर दिले. यावेळी चांगलाच वाद रंगला. यावर गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी, आपण शुक्रवारपर्यंत तुमची मागणी पूर्ण करू, असे सांगितले.दरम्यान, यावेळी ग्रामीण पाणी पुरवठाचे शशिकांत शिंदे, धनाजी शेवाळे, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट, पी. के. शिरसाट, आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजनाआरोग्य खात्यावर बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी आकडेवारीसह कोविड सद्यस्थिती व तिसऱ्या लाटेबाबत केलेली उपाययोजना सज्जता, लसीकरणाची परिस्थिती विषद केली. सध्या १८ हजाराच्या वर लसीकरण झाले असून सर्व सात आरोग्य केंद्रे, ३५ उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू आहे. गुजरात सीमेवरील मुळवड परिरातील बऱ्याच वाड्या, पाडे येथे अशिक्षित अंधश्रद्धा यामुळे लसीकरण करून घेण्यास विरोध करतात. यावर खोसकर यांनी, सर्व खात्यांच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, लोकांचे मन वळविण्यास मदत करावी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्यसेवक आदींनी लोकांचे प्रबोधन करावे व त्यांचे लसीकरण करवून घ्यावे, अशा सूचना केल्या.