नाशिक : अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या निर्णयानुसार विविध मागण्यांसाठी बुधवार (दि.१८) ते शुक्रवार (दि.२०) या काळात शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याने तीन दिवस शाळा बंद राहणार आहेत.२८ आॅगस्ट २०१५ रोजी जारी करण्यात आलेल्या शाळा संरचनेबाबतच्या शासन निर्णयाची त्वरित अमंलबजावणी करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधाबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, मूल्यांकन निकषपात्र शाळांना त्वरित अनुदान द्यावे, भरतीवरील बंदी उठवून सर्व संवर्गातील पदे भरण्यात यावी आदिंसह मागण्या करण्यात आल्या. दोन लाखांपर्यंत वैद्यकीय देयक मंजुरीचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मिळावे, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदि मागण्यांसाठी तीनदिवसीय शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे विद्या सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापक महामंडळाचा तीन दिवस ‘शाळाबंद’चा इशारा
By admin | Published: January 16, 2017 1:32 AM