नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आरोग्य यंत्रणा चोवीस तास अतिशय सतर्क राहील यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक बदल व पुरेशी यंत्रणा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती गृह व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली़ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य विभागाचा कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला़ शिंदे म्हणाले, कुंभमेळा हा सर्व विभागाच्या समन्वयाने यशस्वी करण्यात येणार आहे़ यामध्ये आरोग्य विभागाचे कार्य महत्त्वाचे आहे़ आरोग्य विभागाने तयार केलेल्या कुंभमेळा आराखड्याचा सर्व निधी लवकरच उपलब्ध केला जाणार आहे़ कुंभमेळ्यात अनिष्ठ गोष्टी तसेच रोगराई टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच कंबर कसली आहे़ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २०० खाटांची नवी पाच कोटी ३६ लाख रुपयांची इमारत उभारण्यात आली आहे़ हे काम मे महिन्यात पूर्ण होणार आहे़ कुंभमेळ्यासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग नाशिक विभागाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ रुग्णालयातील बंद असलेल्या सीटी स्कॅन यंत्रणेबाबत विचारले असता हा प्रश्न संपूर्ण राज्याचा आहे ही यंत्रणा लोक सहभागातून कार्यान्वित करण्यात आली होती़ यासाठी नेमण्यात आलेल्या सामाजिक संस्थेने काही अडचणींमुळे हे काम थांबविले आहे़ मंत्रिमंडळात यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़शिंदे यांनी दुपारी दोन वाजता जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली़ त्यांनी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन कक्ष, नर्सिंग रूम, स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट, अतिदक्षता विभाग यांसह जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारीतीच्या बांधकामाची पाहणी केली़ तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयात जाऊन जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा घेतला़ आरोग्य उपसंचालक बी़ डी़ पवार यांच्या कार्यालयात शिंदे यांना कुंभमेळा तयारीचे चलचित्रांद्वारे सादरीकरण करण्यात आले़ याप्रसंगी माजी आमदार वसंत गिते, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सतीश कुलकर्णी, सुरेश पाटील, आळासाहेब पाटील, प्रकाश सोनवणे, गणेश कांबळे, आरोग्य उपसंचालक बी़ डी़ पवार, जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाघचौरे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
क़ुंभमेळ्यात आरोग्य विभाग चोवीस तास असेल सतर्क
By admin | Published: January 30, 2015 12:29 AM