लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रूग्ण पॉझेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले नसल्याची समाधानाची बाब असली तरी, कोरोनाच्या संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोरोना उपचाराचा अंतीम टप्पा मानला गेलेल्या जीवरक्षक यंत्रणा (व्हेंटीलेटर) हाताळणीसाठी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना प्रशिक्षण देण्याची तयारी आरोग्य विभागाने चालविली असून, आपातपरिस्थिती उद्भवल्यास देवळाली कॅम्पच्या बार्नस्कूलचे रूपांतर रूग्णालयात करण्याचा विचारही सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून दररोज शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करून त्यांचा पुर्वेतिहास तपासला जात आहे. त्याच बरोबर संशयित रूग्णांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे असलेली साधन सामुग्री, उपकरणे, मनुष्यबळ या संदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. सध्या तरी जिल्ह्यात घाबरण्यायोग्य परिस्थिती नसली तरी, नागरिकांनी काळजी घेणे हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. तथापि, लगतच्या मुंबई, पुणे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयित रूग्ण सापडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यानेही आपली तयारी करून ठेवली आहे. कोरोनाच्या अंतीम टप्प्यात रूग्णाला जीवरक्षक यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवले जाते. मात्र सदरची यंत्रणेची तंत्रशुद्ध हाताळणी करण्यासाठी प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची गरज ओळखून जिल्हा शल्य चिकीत्सकांनी सहाशे डॉक्टर, तेराशे परिचारिकांना व्हेंटीलेटर हाताळणी प्रशिक्षण देण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर खासगी डॉक्टरांनाही त्यात सामावून घेण्यात येणार आहे. कोरोना बाधित रूग्णावर उपचार व त्यांची काळजी घेण्याबाबत देखील आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी आयएमए या डॉक्टरांची संघटना, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाची मदत घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. देवळाली कॅम्पच्या बार्नस्कूलमध्ये कोरांटाईन हॉस्पिटल सुरू करण्यास संबंधित संस्थेने अनुमती दर्शविली असल्याने याठिकाणी दोनशे खाटांची व्यवस्था होऊ शकेल असे आरोग्य सुत्रांचे म्हणणे आहे.