नाशिक : कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत चाललेले असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, या आंदोलनातनाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने कोरोनाचा मुकाबला करण्याच्या कामात नव्याने संकट निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविले जात असून, यासाठी दरवर्षी या अभियानासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक अशा विविध संवर्गासाठी हजारो पदे भरली जातात. दरवर्षी त्यांची सेवा खंडित करून पुन्हा नव्याने जाहिरात काढून भरती केली जाते. कोरोनाच्या संकट काळात राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा बजावली असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आरोग्यसेवेत कायम करावे, अशी मागणी करून आंदोलन सुरू केले आहे. प्रारंभी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधले, त्यानंतर एक दिवस कामबंद आंदोलन करून शासनाला निवेदनही सादर केले. मात्र तरीही दखल घेतली गेली नाही. उलट कोरोनाच्या काळात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यात १७ हजार आरोग्याची रिक्त पदे भरण्याची तयारी चालविली आहे. असे असताना नवीन भरती करण्याऐवजी आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम करावे या मागणीसाठी गुरुवार (दि. ११) पासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. राज्यात आरोग्य मिशनचे सुमारे १८ हजार कर्मचारी असून, नाशिक जिल्ह्यात अडीच हजार कर्मचारी आहेत. गुरुवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यालयात सर्व कर्मचाºयांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाच्या कामकाज ठप्प झाले असून, ऐन कोरोनाच्या संकटाच्या काळात नवीन संकट उभे ठाकले आहे. या आंदोलनात संगीता सरदार, कुंदा सहारे, किरण शिंदे, दिलीप उटाणे, बाजीराव कांबळे, अरुण खरमाटे यांच्यासह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.
आरोग्य मिशनचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 4:06 PM
राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने कोरोनाचा मुकाबला करण्याच्या कामात नव्याने संकट निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देकोरोनाविरोधी लढ्यात नव्याने संकट राष्ट्रीय आरोग्य मिशनचे कंत्राटी कर्मचारी संपावर कायमस्वरूपी सेवेत सामील करून घेण्याची मागणी