नाशिक - गेल्या काही दिवसांत कडक ऊन, थंडी आणि पाऊस असे तिन्ही ऋतू एकदमच बघायला मिळाले. वयोमानापरत्वे होणारे सांध्यांचे त्रास, पाठ व कंबरदुखी, मान, कंबर व स्नायू लचकणे हे त्रासही वाढल्याचे निदर्शनास येत आहेत. विशेषत्वे थंडीच्या वाढत्या कडाक्यात वयोमानाने होणारे सांधेदुखीचे त्रास टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात शेकण्यासह निरगुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होऊ शकतो, असा सल्ला घरगुती उपायांमध्ये ज्येष्ठांकडून दिला जातो.
थंडीच्या दिवसांमध्ये आधीपासून संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. संधिवाताचा त्रास असलेल्यांना हिवाळा सुरू झाल्यावर काहीजणांचे मुख्यत्वे सांधे खूप दुखू लागतात. प्रत्येक वर्षी थंडीची तीव्रता किती असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हिवाळा ऋतू सुरू होताना काळजी घेणे आवश्यक असते. युरिक ॲसिडचे शरीरामध्ये प्रमाण अधिक झाले, की ते सांध्यांमध्ये साचते. हे युरिक ॲसिडचे प्रमाण अधिक असणाऱ्यांनी मांसाहार कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
कोमट पाणी पिणे, ताजा, गरम आहार घेण्याचा सल्लाही दिला जातो. पूर्वी ज्या ठिकाणी मार लागलेला असतो, त्या बाजूला रक्तपुरवठा कमी होतो, वेदना निर्माण होणारे घटक जेथे असतात त्याचा निचरा व्हायला हवा, तो होत नसल्यामुळे या वेदनांचा ठणका वाढत जातो. थंडीमध्ये अनेकदा मार लागलेल्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे काही वेदना पुन्हा उफाळून येतात. एका टबमध्ये कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून आपले दोन्ही पाय बुडवा. त्याने थकवा दूर होऊन चालताना सूज आली असल्यास त्यावरही काहीसा आराम मिळतो.