लोहोणेर : देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे व त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. दोन व्यक्तींमधील अंतर किमान चार फूट असावे, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती देणे, त्या कुटुंबाची जबाबदारी असून, जर कोणी अशी माहिती न देता बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना घरी ठेवले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. मांडगे यांनी सांगितले. त्याच बरोबर ज्यांना सर्दी, खोकला, शिंका असे लक्षणे दिसत असतील त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात देवळा येथे उपचारासाठी नेण्यात यावे. कोणीही अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयवंता बच्छाव यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार बनसोडे, विस्तार अधिकारी जे. एस. भामरे, सदस्य दीपक बच्छाव, रमेश आहिरे, योगेश पवार, वैभव धामणे, पंडित पाठक, पोलीसपाटील अरु ण उशिरे, भिका जाधव, आरोग्यसेवक परदेशी, सोपान सोनवणे, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, भूषण आहिरे आदी उपस्थित होते. तसेच खरेदीसाठी ग्राहकाची झुंबड उडू नये म्हणून सकाळी ७ ते दुपारी १२ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. भाजीपाला विक्रेत्यांसाठी सकाळ-संध्याकाळ दोन तास वेळ निश्चित करण्यात आली आहे.
लोहोणेरला आरोग्याबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:42 PM