सिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालयाच्या पाठीमागील कॉलनीतील नागरी वसाहतीत आवाजाच्या यंत्राचा वापर करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लघुउद्योग व्यावसायिकाविरोधात शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी आक्षेप घेतला असून, याविरोधात त्यांनी सिडको प्रशासनास निवेदनही दिले आहे.सिडको प्रशासकीय कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस नागरी वसाहत आहे. याच वसाहतीतील एका बंगल्यामध्ये एका व्यावसायिकाने लघुउद्योग सुरू केला आहे. बंगल्याला सर्व बाजूंनी आठ ते दहा फूट पत्रे लावले असून, या बंगल्यामध्ये यंत्राच्या सहाय्याने काम केले जाते. या यंत्राच्या आवाजामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांची रात्रीची झोप उडाली असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यावसायिकाकडे सतत वाहनांची ये-जा सुरू असल्याने याचाही त्रास नागरिकांना होत आहे. नागरी वसाहतीत एका बंगल्यामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी कशी देता येते, तसेच या व्यवसायासाठी वीज वितरण कार्यालयाने परवानगी दिलीच कशी, असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत शेजारीच राहणारे रहिवासी आर. एस. मूर्ती यांनी सिडको प्रशासकीय कार्यालयास सदर लघुउद्योग तातडीने बंद करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
आवाजाच्या प्रदूषणामुळे आरोग्याला धोका
By admin | Published: October 19, 2015 10:35 PM