लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहरातील एका इसमास कोरोनाने पछाडल्याचे स्पष्ट होताच सोमवारी आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. कोरोनासदृश लक्षणांमुळे संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा हा रुग्ण अलीकडेच दिल्लीहून परतल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णामुळे संसर्ग वाढू नये म्हणून सायंकाळपासून पोलीस व आरोग्य यंत्रणेने रुग्णाच्या निवासस्थानाच्या परिसराचा ताबा घेतला असून, त्याच्याशी संबंधित व्यक्ती, नातेवाइकांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने तेरा संशयित दाखल करण्यात आले आहेत.शहरात दिल्लीहून परत आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने दिल्लीहून परतलेल्या नागरिकांना स्वत:हून तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले असून, बाधित रुग्णाच्या संबंधित सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. सायंकाळी यासंदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर रुग्ण हा दिल्लीनजीकच्या आग्रा येथे कामासंदर्भात गेला होता. त्याची माहिती पोलीस व आरोग्य विभागाला मिळाल्यामुळे त्याला घरातूनच पोलीस पथकाने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते.नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत असताना, जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणांवरून दाखल करण्यात २३४ रुग्णांपैकी २१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा काहीशी निर्धास्त होती. मात्र दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बाब समाधानकारक असताना तसेच नाशिक शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्यामुळे शहरवासीय काहीसे निर्धास्त झाले होते. मात्र शनिवारी प्रकृतीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या एका ४४ वर्षीय इसमाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला व त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. त्याला तातडीने स्वतंत्र कक्षात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करण्यात आले असून, तो दिल्लीहून परतल्यानंतर कोणाकोणाच्या संपर्कात आला, अशांची माहिती मिळविण्याबरोबरच त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, मित्र, नातेवाइकांचा शोध सुरू झाला आहे. त्याचबरोबर तो राहात असलेल्या भागाची नाकाबंदी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या संशयावरून गेल्या तीन दिवसांपासून दाखल असलेल्या ५५ रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील त्यातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सोमवारी नव्याने तेरा संशयित उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महानगरात आढळलेल्या या रुग्णामध्ये कोरोनाची मानली जाणारी प्रमुख लक्षणे आलेली नाहीत. तरीही संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या ती चिंतेची बाब ठरली आहे, त्यामुळे शहरात प्रमुख लक्षणे नसणारे रुग्णही कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता वाढली आहे. धुळ्याची प्रयोगशाळा नावापुरतीचदरम्यान, राज्यातील नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले जात असल्याने त्याचा अहवाल येण्यास होत असलेला विलंब पाहता राज्य सरकारने उत्तर महाराष्टÑातील नमुने तपासणीसाठी धुळे येथे प्रयोगशाळा कार्यान्वित केली. नाशिकचे नमुनेही पुणे येथेच तपासणीसाठी पाठविले जात होते. परंतु त्याचा अहवाल दोन दिवसांनी मिळत असल्यामुळे त्याचबरोबर पुणे-नाशिक अंतरही बरेच असल्याने वेळेचा अपव्यव होत होता. त्यामुळे धुळे येथे तपासणीची सोय झाल्याने नाशिकहून दोन दिवस नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु धुळ्याच्या प्रयोगशाळेची क्षमता फक्त ९० नमुनेच तपासण्याची असल्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांच्या काळातील रुग्णांचे नमुने धुळे येथे पाठविले असता रविवारी तपासणी किट संपल्याच्या कारणावरून नमुने परत नाशिकला पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयाने पुन्हा धावपळ करीत ते पुणे येथे रवाना केले. त्यामुळे धुळ्याची प्रयोगशाळा नाममात्र ठरली आहे.
कोरोना रुग्णामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 11:30 PM
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहरातील एका इसमास कोरोनाने पछाडल्याचे स्पष्ट होताच सोमवारी आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. कोरोनासदृश लक्षणांमुळे संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा हा रुग्ण अलीकडेच दिल्लीहून परतल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णामुळे संसर्ग वाढू नये म्हणून सायंकाळपासून पोलीस व आरोग्य यंत्रणेने रुग्णाच्या निवासस्थानाच्या परिसराचा ताबा घेतला असून, त्याच्याशी संबंधित व्यक्ती, नातेवाइकांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने तेरा संशयित दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे संख्या दोनवर : काही भागांची नाकाबंदी, रुग्णाशी संबंधितांचा शोध; नव्याने १३ रुग्ण दाखल