पुरुषोत्तम राठोड
घोटी : सर्वांना हादरवून टाकणाऱ्या कोरोनानंतर आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने सर्वांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या विषाणूच्या संभाव्य धोक्याला सामोरे जाण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, १८८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण होऊ नये, यासाठी एका आठवड्यात एक हजार नागरिकांच्या तपासण्या केल्या जात असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत ७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यात १६५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण व तपासण्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजार ९५४ (८७ टक्के) नागरिकांना पहिला डोस दिला गेला असून दुसरा डोस ८४ हजार (४२ टक्के) जणांना देण्यात आला आहे.
इगतपुरी हा आदिवासी तालुका असून लसीकरणासंदर्भात नागरिकांत मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याने आरोग्य यंत्रणेची लसीकरणासाठी मोठी दमछाक होत आहे. वाड्यापाड्यांवर जाऊन जनजागृती करून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुक्यातील लोकसंख्या अंदाजे तीन लाख असून अजूनपर्यंत लसीकरण झालेले नसल्याने मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर ठाकले आहे.
ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करून घेतल्या जात आहेत. तालुक्यात २ ग्रामीण रुग्णालय असून ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. २० वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १८८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज असून दररोज २००च्या जवळपास आरटीपीसीआर व अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. आठवड्याला १ हजार तपासण्या करण्याचा मानस आरोग्य विभागाचा असून आतापर्यंत १ लाख १७ हजार टेस्ट झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर २३०० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता १८ मुले पॉझिटिव्ह आले असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. घोटी व इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्याने रुग्णालये भरले आहेत. वाढत्या रुग्णांमुळे तपासण्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
231221\23nsk_34_23122021_13.jpg
घोटी ग्रामीण रुग्णालय