वारेगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली पोलीस चौकी.सिन्नर/पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाने वारेगाव येथे ठाण मांडले आहे. वारेगाव, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द आणि कोळगावमाळ या चार गावात सलग दुसºया दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला.दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या निकटवर्तीयांना नाशिक येथील डॉक्टर जाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात असून, त्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. तथापि, महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा या चारही गावांमध्ये योग्य ती काळजी घेत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली ३० आरोग्य पथकाने परिसरातील सुमारे १५०० कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. या परिसरात सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण आढळला नसल्याची माहिती डॉ. बच्छाव यांनी दिली. तरीही १४ दिवस आरोग्य विभाग या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे.आरोग्य पथकांना वैद्यकीय तपासणी माहिती एकत्रित करण्यासाठी आणि बसण्यासाठी येथील उपकेंद्राच्या आवारात ग्रामपंचायतच्या वतीने मंडपाची, बैठकीची सोय करण्यात आली आहे. त्यांना पाण्याचीही सोय उपलब्ध केली आहे. वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वारेगावच्या चौकात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे.
वारेगाव येथे आरोग्य यंत्रणेचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:43 PM