सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना ससर्गाच्या पाश्वभूमीवर हिंदुस्थान लिव्हर येथील कोविड 19 च्या वाढत्या केसेस बघता तहसीलदार राहूल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन संसर्ग रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.गेल्या काही दिवसात शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीशी संबंध असल्याने तसेच नाशिक शहरातही कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, कामगार कोरोना बाधित असल्याचे अहवाल आल्याने कोरोचा संसर्ग वाढू नये यासाठी तहसिलदार कोताडे यांच्यासह आरोग्य पथकाने कंपनीला भेट देऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत आईस्क्रीमचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तेथील वातावरण अतिशय थंड असून कोरोना संसर्गाला पोषक ठरणारे असल्याने कंपनी व्यवस्थापनाने यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, कंपनीतील कोल्ड स्टोअरेजमध्ये काम करणार्या कामगारांना पिपीई कीट, फेसशिल्डचा वापर करावा, इतर कामगारांनी मास्क व इतर सुरक्षा संसाधनांचा वापर करावा, कामगारांना कारखान्यात प्रवेश करण्यापुर्वी सॅनिटाईज करावे, शिप्ट बदल्यानंतर कामगार काम करत असलेली जागा, वाहनांची पार्किंग सॅनिटाईज करावी यासारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना तहसिलदार कोताडे यांनी केल्या.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरला दिलेल्या मदतीबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. तसेच यापुढेही मदतीचा ओघ सुरु ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.