लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६ ) लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. कुलगुरुपदासाठी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत ५ जुलैला राजभवनात झालेल्या मुलाखतीत निवड समितीने सुचविलेल्या ५ उमेदवारांपैकी डॉ. माधुरी कानिटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, त्या सैन्यदलातीत आरोग्य सेवेत कार्यरत असून त्यांच्या सैन्यातून कार्यमुक्तीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. या काळात डॉ. माधुरी कानिटकर ऑनलाईन माध्यमातून आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, तसेच कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह व्यवस्थापनातील विविध घटकांचे प्रश्न समजावून घेत आहेत. विद्यार्थी व व्यवस्थानाचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केल्यास अधिक प्रभावीपणे काम करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोट-
सैन्यदलातून कार्यमुक्ती घेण्याच्या प्रक्रियेसाठी सध्या दिल्लीत आहे. कार्यमुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे आताच सांगणे कठीण आहे. कार्यमुक्तीनंतर कुलगुरू पदासाठी नियुक्तिपत्र घेईल. सध्या ऑनलाईन माध्यमातून संवाद साधून विद्यापीठाचे कामकाज समजून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. - लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
200721\20nsk_49_20072021_13.jpg
डॉ. माधुरी कानिटकर