सातपूर : समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ही रॅली नाशिक विभागात प्रवेश करीत असून, रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली. अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने १६ आॅक्टोबरपासून देशाच्या सहा वेगवेगळ्या भागातून सायकल रॅली निघालेल्या आहेत. त्यातील तीन रॅली महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील एक रॅली नाशिक विभागातून जात आहे. या रॅलीचे स्वागत मंगळवारी कासारी (नांदगाव) येथे करण्यात येणार आहे. पथनाट्य, लोकनृत्य लेजीम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक विभागात अहमदनगर, नेवासा, मालेगाव, धुळे व शिरपूर आदी ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वागत केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृतीसोबतच भेसळी संदर्भातील चाचण्याही करून दाखविल्या जाणार आहेत.शाळांमधून अन्न हेच औषध, आरोग्याची गुरुकिल्ली या विषयांवर पोस्टर व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटासाठी अन्नपदार्थ व खानपान पद्धतींबाबत मार्गदर्शक पुस्तिका बनविण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने जागतिक अन्न दिवसानिमित्ताने देशाच्या जम्मू-काश्मीर, आगरतला, पोंडीचरी, केरळ, गोवा, रांची आदी सहा वेगवेगळ्या भागांतून रॅली निघालेल्या आहेत. त्यातील केरळ (तिरुवानंतपूरम)ची रॅली महाराष्ट्रातून आणि नाशिक विभागातून जात आहे. ही रॅली नांदगाव (कासारी) येथे मंगळवारी येणार असून, नाशिक विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी ही रॅली नाशिक विभागातून (महाराष्ट्रातून) मध्य प्रदेशात जाणार असल्याने शिरपूरला निरोप दिला जाईल. विविध भागांतून निघालेल्या रॅलीचे २७ रोजी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे.- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
‘स्वस्थ भारत यात्रा’ आज नाशिक जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:23 AM