मालेगाव : शहर - तालुक्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेल्या विविध प्रकारच्या आंब्यांपैकी बहुसंख्य आंबे नैसर्गिकरीत्या न पिकवता कॅल्शिअम कार्बाईड या शासनाने बंदी घातलेल्या घातक रसायनाचा वापर करून पिकवण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.झटपट व अधिक पैशांच्या लोभापायी आंबा व्यापारी व विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ चालला असून, अन्न व औषध प्रशासन त्याविरोधात कारवाई करीत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. अलीकडच्या काळात काही वर्षांपासून मार्च महिन्यापासूनच आंबे बाजारपेठेत दाखल होत आहेत. हा आंबा नैसर्गिकरीत्या पिकवलेला नसून, कृत्रिमरीत्या कॅल्शिअम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर करून पिकविण्यात येत आहे. नफेखोरीसाठी व्यापारी कार्बाईडच्या पुड्या आंब्यामध्ये ठेवत आहेत. कार्बाईडची फवारणी आंब्यावर केली जाते. त्यामुळे अवघ्या काही तासांतच कैरीचे रूपांतर आंब्यात होते. सध्या शहर-तालुक्यात राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सुरू आहे. शहरात आंब्याचे चार-पाच मोठे व्यापारी असून, किरकोळ विक्रेत्यांची संख्याही साधारण दोनशेच्या घरात आहे. बाजार समिती आवारात आंबा लिलाव व विक्रीनंतर सर्रास कॅल्शिअम कॉर्बाईडच्या पुड्या इतरत्र फेकलेल्या आढळतात. शहरातील जवळपास सर्वच आंबाविक्रेते हे आपापल्या घरपरिसरात कॅल्शिअम कॉर्बाईडचा वापर करून रात्रीतून पिकवलेले आंबे दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या फळविक्रेत्यांच्या घर परिसरातदेखील या घातक रसायनांचा वास येऊन प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वास्तविक आंबा पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे हा गुन्हा असताना फळव्यापारी व फळविक्रेते सर्रासपणे खुलेआम या घातक रसायनांचा वापर करीत आहेत. यासंदर्भात जबाबदारी असलेले मनपाच्या अखत्यारीतील अन्न व औेषध प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येते आहे. (प्रतिनिधी)
आरोग्याशी खेळ : मालेगावी अन्न व औषध प्रशासन सुस्त
By admin | Published: June 01, 2015 10:56 PM