नाशिक : राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मैत्रेय कंपनीचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा जामीन अर्ज तसेच इस्क्रो खात्यातील जमा रक्कम गुंतवणूकदारांना परत करणे याबाबत नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (दि़ ११) निर्णय होण्याची शक्यता आहे़ ‘मैत्रेय’च्या संचालकांनी इस्क्रो खात्यातील रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र २ जुलै रोजी न्यायालयास सादर केले होते़ यामुळे गुंतवणूकदारांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पोलीस प्रशासनाने प्राधान्यक्रमानुसार १२५ गुंतवणूकदारांची यादीही न्यायालयात सादर केली आहे़ तसेच पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार इस्क्रोमधील रक्कम परत करण्यासाठीच्या विशेष समितीस न्यायालयाने मान्यता दिली होती़ न्यायालयाने या विशेष समितीच्या कार्यवाही प्रणालीबाबत ८ जुलै रोजी सादरीकरणाचे आदेश पोलिसांना दिले होते़ त्यानुसार पोलिसांनी समितीमध्ये मैत्रेय कंपनीचा प्रतिनिधी, ठेवीदारांचा प्रतिनिधी, पोलीस तपासी अंमलदार व तहसीलदार यांचा समावेश असलेली समिती स्थापन करून तिचे कार्य, कामकाज व पैसे परत करण्याबाबतचे नियोजनाचे सादरीकरण केले़ त्यामुळे सोमवारी न्यायालयात विशेष अधिकार समिती व प्राधान्यक्रम यादीवर संचालकांच्या जामिनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़न्यायालयाच्या आदेशानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास प्रारंभ होणार आहे़ दरम्यान, मैत्रेयविरोधात पोलिसांकडे आतापर्यंत सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांनी तक्रार केली असून, फसवणुकीची रक्कम २६ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तर सत्पाळकर यांनी इस्क्रो खात्यामध्ये ५ कोटी ९ लाख रुपये जमा केले आहेत. (प्रतिनिधी)
‘मैत्रेय’ प्रकरणी आज सुनावणी
By admin | Published: July 10, 2016 11:37 PM