हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चेतंग नदीला पूर आल्याने यमुनानगर जिल्ह्यातील सुखदासपूर गावातील शेती पाण्याखाली बुडाली आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही चार फूट पाणी भरले आहे. या पुरामुळे शेती पाण्यासाठी जाऊन नुकसान झाल्याने धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
इंद्राज असं या ५० वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून, पूर आल्याने त्यांना आपल्या शेतातील पिकांबाबत चिंता वाटत होती. ते शेतामध्ये गेले असता सगळं पिक पुराच्या पाण्याखाली गेलेलं दिसलं. सगळं पिक वाया गेल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. घरी पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. रस्त्यावर पुराचं पाणी भरलेलं असल्याने कुटुंबीय त्यांना ट्रॅक्टरवरून कसेबसे डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
गावचे सरपंच भूपिंदर सैनी यांनी सांगितले की, गावाजवळून चेतंग नदी वाहते. या नदीला पूर आल्याने शेतांमध्ये पाणी भरलं होतं. दरम्यान, पुरामुळे इंद्राज यांच्यावर अंत्यसंस्कार करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंत्यसंस्कारासाठी ज्या नातेवाईकांना यायचं होतं त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने सरस्वतीनगर येथून सुखदासपूर येथे आणण्यात आलं. इंद्राज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. तपासानंतर मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध लागणार आहे.