नाशिक : महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या तणावाचे निमित्त करून सेना आणि भाजपात राजकारण सुरू झाले असून, भाजपाने संघटना म्हणून शिरकाव करण्यासाठी हे निमित्त शोधले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही पत्रकबहाद्दर सेना असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला असून, दुसरीकडे मात्र तणाव मुख्यमंत्र्यांमुळेच वाढला आहे, परंतु त्याला उत्तर देण्याची भाजपात धमक नसल्याने अकारण सेनेवर टीका करीत असल्याचा दावा कर्मचारी सेनेच्या अध्यक्षांनी केला आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यातच मध्यंतरी नगररचना विभागाचे सहायक अभियंता रवींद्र पाटील घर सोडून गेले होते. त्यानंतर हा विषय अधिकच ऐरणीवर आल्यानंतर भाजपाच्या काही नगरसेवकांनी हेच हेरले. विशेषत: मुकेश शहाणे व जगदीश पाटील यांनी यासंदर्भात सर्व विभागांमध्ये फिरून अधिकारी आणि कर्मचाºयांवर काही कामाचा ताण आहे काय याची विभागनिहाय फिरून चौकशी केली होती. त्यानंतर भाजपानेच ही संधी साधून अधिकारी कर्मचाºयांची संघटना बांधण्याची तयारी सुरू केली आहे. असे करताना त्यांची महापालिकेतील मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या नाकर्तेपणावर ठपका ठेवला आहे. ही संघटना अनेक वर्षांपासून असूनदेखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा कामगार हिताचा निर्णय घेतला गेलेला नाही. ही पत्रकबहाद्दर सेना असल्याचा आरोप करीत यापुढे भाजपा अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पाठीशी उभी राहील, असा दावा केला आहे. दरम्यान, यासंदर्भात म्युनिसिपल सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला असून, बच्चू कडू प्रकरणात अधिकाºयांच्या पाठीशी सेनाच होती. त्याचप्रमाणे माजी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी ४० पैकी २५ मागण्या मान्य केल्या होत्या आणि धोरणात्मक बाबींबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेतला होता. परंतु त्यांची बदली झाली आणि नवीन आयुक्तांनी या मागण्यांच्या फाईल पेंडिंग ठेवल्या. नूतन आयुक्तांची नेमणूक ही मुख्यमंत्र्यांनी केली असून, त्यामुळे कामाचा ताण वाढत असेल तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या तणावावरून तापले वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:43 AM