नाशिक : उन्हाच्या तीव्रतेमुळे शहराच्या वातावरणात उष्मा प्रचंड वाढला असून कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत मंगळवारी (दि.१३) पोहचला. एकूणच वाढत्या उष्म्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे.एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे. शहर उन्हाळ्यात मुंबई, पुण्याच्या तुलनेने तापू लागले आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपत असून कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या जवळपास आला आहे.
पुढील पंधरा दिवस सरायचे असून एप्रिल व मे महिन्यात उन्हाची दाहकतेची कल्पना करणे चिंताजनक आहे. एकूणच नाशिककरांनी आपल्या जीवनशैलीकडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तपमानामागे मानवाची जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. वातानुकूलित यंत्रांचा भरमसाठ वापर, वाहनांचा वापर, प्लॅस्टिकचा वापर, वृक्ष लागवड संवर्धनाबाबत असलेली उदासिनता यामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. याचा परिणाम हवामानावर होत आहे. मंगळवारी शहराचे किमान तपमान १७.६ अंश इतके नोंदविले गेले. तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानाचा पारा चढता राहिला. ३५अंशाच्या आसपास स्थिरावरणारा पारा शनिवारपासून (दि.१०)३६ अंशाच्या पुढे सरकण्यास सुरूवात झाली. तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले. गेल्या वर्षी १३ मार्च रोजी ३३ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.