नाशिक : शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून उन्हाची तीव्रततेत अधिकाधिक वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (दि.२७) ३९.८ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा पोहोचला तर किमान तापमानाचा पारासुद्धा अचानकपणे वाढल्याने २२.८ अंश इतकी नोंद झाली. यामुळे मंगळवारी नाशिककर उन्हाच्या असह्य होणाऱ्या अति तीव्र झळांनी त्रस्त झाले.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. कमाल व किमान तापमानाचा पारा सातत्याने चढता राहत असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणे कठीण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज कमाल आणि किमान तापमानात तीन ते चार अंशांनी वाढच होताना दिसते आहे.
यामुळे नागरिकांना सध्या नाशकात 'हॉट' वातावरण अनुभवयास मिळत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नाशिककर वातानुकूलित यंत्रांसह कूलर, पंख्याच्या वापरावर भर देत आहे. रविवारपासून नाशिकचे वातावरण 'हॉट' झाले आहे. रात्रीही उकाड्यापासून नागरिकांची सुटका होताना दिसत नाही. कमाल तपमानात पुढील काही दिवस अशीच वाढ होत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एप्रिलचा अखेरचा हा आठवडा अधिकाधिक 'ताप'दायक ठरत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानाचा पारा चाळिशी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
----इन्फो----
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
शहराच्या तापमानाची वाटचाल चाळिशीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास काही वेळ ढगाळ हवामानही नागरिकांना बघावयास मिळाले. हवामान खात्याकडून संध्याकाळी पुढील काही तासांत नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. बेमोसमी पावसाने हजेरी लावल्यास त्याचा काहीसा परिणाम वातावरणात जाणवेल; मात्र त्यामुळे खूप काही फरक पडणार नाही.
----इन्फो---
शहराचे कमाल तापमान असे....
मंगळवार - ३६.३
बुधवार- ३५.८
गुरुवार - ३६.१
शुक्रवार- ३५.६
शनिवार- ३७.३
रविवार- ३९.४
सोमवार- ३९.५
मंगळवार- ३९.८