--
शीतपेयांना मागणी वाढली
नाशिक : शहरात तपमानाचा पारा वाढल्याने शीतपेयांनाही मागणी वाढली आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांकडून उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, लस्सी, ताक यासारख्या पारंपरिक शीतपेयांसह वेगवेगळ्या प्रकारच्या थंड पेयांनाही पसंती मिळत आहे. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
--
बाजार समिती आवारात मास्कशिवाय वावर
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अनेक जण मास्कशिवाय वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याठिकाणी जिल्हाभरातून शेतकरी, व्यापारी माल खरेदी विक्रीसाठी येत असल्याने संसर्गाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या भागात मास्क सक्तीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची मागणी होत आहे.
--
अश्वमेध चौकात नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागातील अश्वमेध चौकात विविध प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन करून दुकाने लावली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्येही फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
--
एमपीएससी परीक्षार्थींची अभ्यासिकांमधून तयारी
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी एमपीएससी परीक्षा रविवारी (दि. १४) रद्द झाल्यानंतर आता येत्या रविवारी (दि.२१) होणार आहे. या परीक्षेसाठी शहरातील विविध अभ्यासिकांमधून विद्यार्थी तयारी करीत आहेत. परीक्षा रद्द होण्याच्या कारणामुळे तणावात असलेल्या परीक्षार्थींनी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे.
---
पेठरोडवर वाहतूक कोंडी
नाशिक : पेठरोड परिसरात सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर भाजी विक्रीची दुकाने लावली जात असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील भाजी विक्रेते त्याचप्रमाणे अन्य किरकोळ विक्रेत्यांची इतरत्र व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.